गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 12 ईच्छुकांनी भरले नामनिर्देशनपत्र

डॅा.मिलींद नरोटे यांचाही समावेश

गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या 12 झाली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ईच्छुक असलेले डॅा.मिलींद नरोटे यांनीही आपला अर्ज भरला आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार असलेले खा.अशोक नेते यांच्या अर्जात काही त्रुटी निघाल्यास पर्याय म्हणून त्यांनी पक्षाच्या सूचनेनुसार नामांकन दाखल केले, की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून त्यांनी हा अनुभव घेतला, अशी चर्चा सुरू आहे.

शेवटच्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांमध्ये डॉ.नामदेव दसाराम किरसान (इंडियन नॅशनल काँग्रेस), धीरज पुरूषोत्तम शेडमागे (जनसेवा गोंडवाना पार्टी), मिलींद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी), योगेश नामदेव गोन्नाडे (बहुजन समाज पार्टी), करण सुरेश सयाम (अपक्ष), सुहास उमेश कुमरे (भीमसेना), विलास शामराव कोडापे (अपक्ष) या आठ उमेदवारांचा समावेश आहे.

यापुर्वी अशोक महादेवराव नेते (भारतीय जनता पार्टी), बारीकराव धर्माजी मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष), हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) आणि विनोद गुरूदास मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष) या चार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

गुरूवार, दि.28 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करून काही त्रुटी राहिलेले अर्ज बाद होतील. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

निवडणूक निरीक्षक अनिमेषकुमार पराशर गडचिरोलीत

या मतदार संघात सामान्य निरीक्षक म्हणून अनिमेष कुमार पराशर (भा.प्र.से.) हे दाखल झाले आहेत. ते सर्किट हाऊस, कॉम्प्लेक्स येथील मार्कंडा कक्षात मुक्कामी आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9420067626 असून कार्यालयीन संपर्क क्रमांक 07132233184 असा आहे. त्‍यांच्याकडे निवडणूकविषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी 11 ते 12 या वेळेत देता येतील, किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.

तसेच निवडणूक खर्च निरिक्षक एस. वेणुगोपाल सर्किट हाऊसमधील चपराळा या कक्षात मुक्कामी आहेत. निवडणूक खर्चविषयक तक्रारी एस.वेणु गोपाल यांच्या 9420067690 या संपर्क क्रमांकावर द्याव्यात, असे निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.