आ.कृष्णा गजबे ठरले आदर्श आमदार, मिळणार लोकप्रतिनिधी पुरस्कार

पुण्यात होणाऱ्या सरपंच परिषदेत ३ ला सन्मान

देसाईगंज : राज्यातील पाच आदर्श असलेले लोकप्रतिनिधी (आमदार), प्रशासकीय सेवेत असलेले पाच उत्तम अधिकारी, लोकनियुक्त १० सरपंच, ५ ग्रामसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पाच सामाजिक कार्यकर्ते यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने येत्या ३ डिसेंबर २०२३ रोजी यशदा, पुणे येथे यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचाही समावेश आहे. त्यामुळे मित्र परिवार, कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

सदर पुरस्कार जनतेचे हित जपण्यासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन देण्यात येणार आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

आमदार गजबे यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याचे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.