खा.अशोक नेते यांच्या नियोजनात रविवारी निर्मलमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा

तेलंगणात निवडणुकीचा ज्वर शिगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी बनविण्यात आलेल्या सभामंडपाची पाहणी करताना खा.अशोक नेते व इतर पदाधिकारी.

गडचिरोली : तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वातावरण तापले आहे. येत्या ३० नोव्हेंबरला तिथे पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सत्तारूढ भारत राष्ट्र समितीला टक्कर देण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे. यातच गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या नियोजनात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्मल येथे जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे तेलंगणाची हवा भाजपच्या बाजुने वळविण्यात मोदी यशस्वी होतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

निर्मल येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील थ्रेशर ग्राऊंडवर ही सभा दुपारी ३ वाजता होणार आहे. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्याकडे निर्मल जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदार संघांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या सभेचे नियोजन खा.नेते यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

दरम्यान सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम होणार आहे. गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा.नेते यांनी केले आहे. याशिवाय चामोर्शी येथील खासदारांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा राहणार आहे. तसेच प्रचाराच्या व्यस्ततेत खा.नेते यांनी रविवारच्या संविधान दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.