गडचिरोलीतील विमानतळाला गती द्या, गोंदियातून विमानांचे ‘टेक ऑफ’ करा

खा.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

गडचिरोली : मागास गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासासह सर्व प्रकारच्या कामांना वेग देण्यासाठी दळणवळणाच्या सोयी महत्वाच्या आहेत. त्यामुळे गडचिरोलीत प्रस्तावित विमानतळाच्या कामाला गती द्या, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेच्या अधिवेशनात नियम ३७७ अन्वये केली. यावेळी त्यांनी सध्या बंद असलेली गोंदियातील बिरसी विमानतळावरील प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली.

गडचिरोली-चिमूर हा देशातील सर्वात मोठा दुर्गम आणि नक्षलग्रस्त, अविकसित असलेला मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिने सुद्धा विस्तृत पसरलेला आहे. गडचिरोलीपासून २०० किलोमीटर अंतरावर गोंदिया जिल्ह्यामध्ये बिरसी येथे विमानतळ उभारण्यात आले. या विमानतळावरून विमान सेवाही सुरू झाली होती, मात्र ती सध्या बंद आहे. त्यामुळे तेथील विमानसेवा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी खा.नेते यांनी केली.

गडचिरोली ते नागपूर विमानतळाचे अंतरही गडचिरोलीपासून 200 किलोमीटर आहे. गडचिरोलीत विमानतळ उभारणीसाठी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र आतापर्यंत त्या प्रस्तावावर लक्षणीय प्रगती झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.