भरड धान्याचे महत्व सांगत शेतकरी महिलांचा केला सन्मान

भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

इंदिरा नगरातील शेतकरी महिलांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे व अन्य.

गडचिरोली : 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य अर्थात श्रीअन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून भाजप महिला मोर्चाच्या वतीने येथील इंदिरानगरातील भरड धान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला.

भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते शेतकरी ललिता नैताम, माया बुरे व ताई नेवारे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका लता लाटकर, नीता उंदिरवाडे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव नीता बैस, अर्चना चन्नावार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी शेतकरी महिलांना मार्गदर्शन करताना योगीता पिपरे म्हणाल्या, महाराष्ट्रभर या भरड धान्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका हे भरड धान्य महाराष्ट्रात ज्या भागात पिकवल्या जाते तिथल्या ग्रामिण भागातील महिला शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तसेच भरड धान्य शरीराला किती पौष्टिक आहे, ते गरोदर मातांना तसेच आपल्या मुलांना देणे गरजेचे आहे असे सांगत त्याचे महत्त्व त्यांनी महिलांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमाअंतर्गत भरड धान्य निगडित गृहउद्योग करणाऱ्या स्वयंसिद्धा महिलांची भेट घेवून त्यांचाही पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येणार असल्याचे पिपरे यांनी सांगितले.