नवयुवक-युवतींनो, मतदानाचा हक्क बजावायचा ना, मग नोंदणी करा

खासदार अशोक नेते यांचे आवाहन

गडचिरोली : नवमतदार हे देशाचा कणा आहेत. ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले त्या व्यक्तीला आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळतो. प्रथमच हा हक्क बजावण्याची उत्सुकता सर्वांना असते. त्यामुळे हा हक्क आणि कर्तव्य बजावण्यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या सर्व नवयुवक-युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले आहे.

मतदार नोंदणीचे अर्ज संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात किंवा भाजपा तालुका अध्यक्षांकडेही उपलब्ध आहेत. याशिवाय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांकडे, एवढेच नाही तर खा.अशोक नेते यांचे जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथेही मतदार नोंदणीसाठी फॅार्म भरण्याची सोय करण्यात आली आहे.

मतदार नोंदणीसाठी १८ आॅगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपआपल्या तालुक्यात नाव नोंदणी करावी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मतदाराचा हक्क बजावावा, असे आवाहन खासदार नेते यांनी केले आहे.