देसाईगंज : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी विरोधीपक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदन सोहळा देसाईगंज येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात वडेट्टीवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
आ.मसराम यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत “नवीन जनसंपर्क कार्यालय हे जनतेसाठी नेहमी खुले राहील आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत राहील,” असे सांगितले.
या कार्यक्रमाला खा.डॉ.नामदेव किरसान, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी सभापती परसराम टिकले, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, आरमोरीचे मिलिंद खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, डॉ. महेश कोपुलवार, मनोज वनमाळी, अमोल मारकवार, राजू रासेकर, इलियास पठाण, सतीश विधाते, कुसुम अलाम यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.