भरधाव माहवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुण गंभीर जखमी

मा.खा.नेते यांनी नेले रुग्णालयात

आरमोरी : कढोली येथील तुकाराम महाविद्यालयात एका भरधाव मालवाहू वाहनाने पायी गावाकडे जाणाऱ्या दोन तरुणांना धडक दिली. जखमी अवस्थेत पडून असलेल्या त्या तरुणांना पाहताच माजी खासदार अशोक नेते यांनी आपले वाहन थांबवत जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विशाल उत्तम भोयर (20 वर्ष, रा.कढोली) आणि सुरज यादव गुरवले (रा.पिसेवर्धा) अशी त्या जखमी तरुणांची नावे आहेत. ते पायी गावाकडे जात असताना मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक देऊन ते वाहन न थांबता पसार झाले. नेमके त्याचवेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते हे कढोली येथील भागवत सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून परतीच्या मार्गावर असताना तुकाराम महाविद्यालयाजवळ ते तरुण गंभीर अवस्थेत दिसले.

त्यामुळे नेते यांनी प्रसंगावधान राखत तातडीने त्यांच्याकडे धाव घेत त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला आणि कोणताही विलंब न लावता डॉ.मोहन आकरे यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली व जखमींना पुढील उपचारांसाठी गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे त्या अपघातग्रस्तांचा पुढील धोका टळला. अशोक नेते यांनी दाखविलेली तळमळ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे.