गडचिरोली : शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी नगर परिषद गडचिरोलीअंतर्गत सुरू असलेल्या महत्त्वाच्या विकास कामांची पाहणी केली. त्यांनी शहरातील नागरी सुविधांच्या विकासाला गती देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भविष्यात अधिकाधिक विकासकामे हाती घेण्यासाठी नवीन प्रकल्पांचे सादरीकरण व प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सूचविले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, उपकार्यकारी अभियंता गणेश परदेशी, उपअभियंता अंकुश भालेराव आणि सुजित खमनकर आदी अधिकारी उपस्थित होते.
गोकुळनगर येथील मामा तलावाच्या सुशोभिकरण आणि विकास प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी पंडा आणि आमदार नरोटे यांनी केली. तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वॉक-वे, बगीचा, प्रवेशद्वार, विश्रांतीस्थळे आणि प्रकाशयोजना यासारखी कामे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांची गती वाढवून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
आ.नरोटे यांनी शहरातील नागरिकांसाठी योग्य पर्यटनस्थळे नसल्याचे सांगून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोबाईल थिएटर प्रकल्पाची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाच्या कार्यवाहीसंबंधी माहिती घेतली आणि लवकरच थिएटर सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
अमृत 2.0 अंतर्गत लांझेडा येथे विकसित होणाऱ्या उद्यानाचे कामही पाहण्यात आले. या उद्यानात खेळणी, वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी जागा, हिरवळ आणि विविध प्रकारची झाडे लावण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत कामाच्या गुणवत्तेत भर देण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मल:निस्सारण प्रकल्प (STP) कार्यान्वित केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली आणि लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. या पाहणीदरम्यान नगर परिषदेकडून प्रस्तावित नवीन विकास प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच प्रस्तावांचे सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या.