एकाच छताखालील विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या- भाग्यश्री आत्राम

महिला सशक्तीकरण अभियानाला गर्दी

भामरागड : केंद्र व राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी, विकसित भारत संकल्प तसेच महिला सशक्तीकरण अभियानातून नागरिकांना विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. महिला सशक्तीकरण अभियानात, खास करून प्रत्येक वयोगटातील महिलांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथे महिला सशक्तीकरण अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, तर विशेष अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम, गटशिक्षणाधिकारी वडलाकोंडा, मलमपोडूरचे सरपंच रोशन वड्डे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा अलोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, आदिवासी सेवक सब्बर बेग मोगल, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोगामी, ग्राम पंचायत सदस्य नीला तिम्मा, अरुणा वेलादी, सुधाकर तिम्मा, रतन दुर्गे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, खेड्यापाड्यात अजूनही बऱ्यात जणांचे आधार अपडेट झालेले नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात आधार केंद्र वाढवून नागरिकांच्या आधार कार्डबाबत असलेल्या अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.

महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती

विशेष अतिथी म्हणून बोलताना अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी महिलांना साध्या आणि सोप्या भाषेत विविध शासकीय योजनांची माहिती दिली आणि दुर्गम भागात त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना आपल्यासाठीच असून त्या सर्व योजना आपल्या हक्काच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक स्टॅालवरून योग्य माहिती घेऊन ‘यात आमच्यासाठी काय?’ असा सवाल लाभार्थ्यांनी केला पाहिजे. तेव्हाच विविध योजनांची माहिती आपल्याला मिळेल आणि त्याचा लाभ घेता येणार, असे आवाहन त्यांनी महिलांना केले.

मलमपोडुर येथील अभियानात विविध विभागाच्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आले होते. लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाहेरी, ईरपणार, हिंदेवाडा, बंगाडी, पुंगासूर, कुकामेटा, लष्कर, होडरी, मुरंगल, भुसेवाडा, पेरमलभट्टी, गोपणार, धीरंगी, हालदंडी आदी गावातून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांनी तर संचालन तलाठी महेंद्र वटी यांनी केले. कार्यक्रमासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.