गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील मुलींची अॅम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भच्या वतीने 19 वर्षाखालील (मुली) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू मुलींना आर्थिक अडचण निर्माण झाली होती. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्यांची अडचण दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून २० हजार रुपयांची मदत कबड्डी खेळाडू मुलींना करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अम्ब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या क्षेत्रातील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात प्रगती करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. या मदतीबद्दल त्या मुलींनी आभार व्यक्त केले. यावेळी सिरोंच्या तालुक्यातील कार्यकर्ते शंकर नरहरी, माधव कासर्ला, सीतापती गट्टू, रमेश मुंगीवार, राजेश संतोषपू, मुरली मारगोनी, शाम बेज्जनी, चंद्रय्या सदनपू, हरीश कोत्तवडला तसेच विद्यार्थिनी व कबड्डी प्रशिक्षक मादेशी उपस्थित होते.