गडचिरोली : 2019 पासून आजतागायत गोगाव आणि अडपल्ली ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषी आढळल्याने ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मेश्राम यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी निलंबित केले. गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालावरून ही कारवाई करण्यात आली. (सविस्तर बातमी खाली वाचा)

दिलीप चौधरी यांच्याकडे 2019 ते 2021 या कालावधीत गोगावच्या, तर 2021 पासून आतापर्यंत अडपल्ली ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी होती. त्यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी झाल्यानंतर गडचिरोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात मेश्राम यांच्या गैरकारभारातील अनेक बाबी समोर आल्या. त्यात हलक्या दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट दर्जाची कामे करणे, विनाटिपीची रेती उचल करणे, ई-टेंडर न करताच साहित्य खरेदी करणे, अंदाजपत्रकाशिवाय कामे करणे,आॅनलाईन आराखड्यात मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे,आवक-जावक रजिस्टरवर मागणीपत्र, पुरवठा आदेश नंबर नसणे, कोटेशन ग्रामपंचायतच्या सभेत मंजूर न करणे, मटेरियल प्राप्तीबाबत डीएम उपलब्ध नसणे, बांधकाम व मटेरियल खरेदीसाठी प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी नसणे, ग्रामनिधी- ग्राम पाणी पुरवठा निधीअंतर्गत नागरिकांकडून वसुल केलेली कराची रक्कम बँकेत न भरता परस्पर वस्तू खरेदी करणे, मासिक सभा- ग्रामसभेचा ठराव पूर्ण न लिहिणे, कॅशबुकप्रमाणे खर्च सभेत वाचून न दाखविणे, मटेरियल खरेदी रकमेच्या बिलातून 2 टक्के जीएसटी कपात न करणे, तसेच स्वत:च्या मुलाच्या नावे ई-टेंडर भरणे, अशा अनेक बाबी समोर आल्या. त्यातून दिलीप मेश्राम यांनी विविध योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून आले.
मेश्राम यांच्या कार्यकाळातील दप्तराची सखोल तपासणी केली जाणार आहे. त्यात त्यांच्याकडून अडथळा आणला जाऊ नये म्हणून त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सीईओंनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. निलंबन काळासाठी त्यांचे मुख्यालय पंचायत समिती सिरोंचा येथे देण्यात आले आहे.