Home राजकीय घडामोडी लोकशाही मुल्यांच्या संवर्धनासाठी भाजपतर्फे आज पदयात्रा व मोर्चा

लोकशाही मुल्यांच्या संवर्धनासाठी भाजपतर्फे आज पदयात्रा व मोर्चा

सहभागी होण्याचे भाजपचे आवाहन

बैठकीला उपस्थित मा.खा.अशोक नेते, आ.बंटी भांगडिया, आ.डॅा.मिलिंद नरोटे व भाजपचे पदाधिकारी

गडचिरोली : लोकशाहीचे रक्षण, लोकशाही मूल्यांचे संवर्धन तसेच सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दि.5 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या संकल्पनेअंतर्गत भव्य पदयात्रा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

डॅा.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष या कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा जिल्हा प्रभारी कीर्तिकुमार भांगडिया होते. मंचावर आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम आणि सदानंद कुथे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ.नेते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार जनहिताच्या विविध योजना, विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रम राबवत आहेत. मात्र विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत लोकशाही मूल्यांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे, वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी संघटितपणे पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणाऱ्या पदयात्रा व मोर्चात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार कीर्तिकुमार भांगडिया म्हणाले, संघटनेमध्ये एकजुटीने व एकसंघपणे कार्य केल्यास निश्चितच त्याचे सकारात्मक फलित मिळते. त्यामुळे आगामी पदयात्रा व मोर्चाच्या अनुषंगाने सर्वांनी समन्वयाने काम करून संघटनात्मक तयारी करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.