गडचिरोली : जिल्ह्यासह आरमोरी विधानसभा मतदारसंघातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान शासनाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, तसेच शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात याव्यात, या मागणीसाठी आमदार रामदास मसराम यांनी 30 ऑक्टोबर रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे खाजगी सचिव चिंचोळीकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
गडचिरोली जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा असून येथील शेतकऱ्यांचे धान कापणीसाठी तयार झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून विक्रीसाठी तयारी केली आहे. मात्र, अद्याप शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू होण्यास विलंब होत असल्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दराने धान खरेदी करून त्यांची आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी तातडीने पूर्ण करून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावीत. तसेच आरमोरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी पुरेशी खरेदी केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी आग्रही मागणी आमदार मसराम यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी व धान खरेदी प्रक्रियेतील विलंबाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली.
































