Home दैनंदिन बातम्या सावधान! वैनगंगेचे पात्र फुगणार, ‘चिचडोह’चे दरवाजे बंद होणार

सावधान! वैनगंगेचे पात्र फुगणार, ‘चिचडोह’चे दरवाजे बंद होणार

जिल्हा प्रशासनाने केले अलर्ट

गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. त्याकरीता 25 ॲाक्टोबरपासून सर्व दरवाजे टप्प्याटप्प्याने (प्रथम नदी काठाकडील व क्रमाने नदीच्या मध्यभागातील) बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात उर्ध्व बाजुस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होऊन त्या नद्यांचे पात्र पाण्याने भरून जाणार आहे.

नदीतील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह धरणाचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. सदर धरण मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. धरणाची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. धरणात दिनांक 23 ॲाक्टोबर रोजी पाणी पातळी 175.30 मी.एवढी आहे.

वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जिवित व वित्तहाणी होऊ नये म्हणून, सर्व लगतच्या गावांना/ ग्रामपंचायतींनी आपल्या गावकऱ्‍यांना याबाबत दवंडीद्वारे सुचीत करण्याचे व नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये, रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. नदी काठावर जाणे टाळण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

कोणत्या गावांना आहे धोका? वाचा

गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड, रामपूर, विसापूर, निमगांव, खोर्दा, हिवरगांव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगांव (रै.), आमगांव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, डोटकुली, डोंगरगांव (बु.), शिवणी, मुडझा (बु.), पुलखल. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी या गावांना धोका होण्याची शक्यता आहे.

वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्तहानी होवू नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे. तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.