गडचिरोली : भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात काही दिवसांपासून सागवान तस्करांनी उच्छाद मांडला असताना वनरक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई करण्यात वनविभागाला यश आले. आंध्र प्रदेशातील एका ट्रकमधून होत असलेली तब्बल 50 लाखांच्या सागवान लाकडांची तस्करी या कारवाईमुळे रोखण्यात आली, मात्र गेल्या पाच दिवसात एकाही आरोपीला अटक करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. असे असले तरीही सागवान तस्करांची लिंक जुळवण्यात यश आले असून अनेक जणांची नावे समोर आली आल्याचे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी सांगितले. त्यामुळे सागवान तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली उपवनक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी झालेल्या या कारवाईत एपी 29, टीए 6954 क्रमांकाच्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड नेले जात असल्याचे वनरक्षक राकेश मडावी यांच्या निदर्शनास आले. त्याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांनी पथकासह जाऊन तो ट्रक ताब्यात घेतला. विशेष म्हणजे धानाच्या कोंड्याच्या पोत्यांखाली हे मौल्यवान सागवान लाकूड लपवण्यात आले होते.
वनविभागाच्या कारवाईबद्दल शंकेचे वातावरण
जप्त केलेला ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे आणत असताना जंगलातील चिखलमय रस्त्यात ट्रक फसला. तब्बल 4 दिवसानंतर म्हणजे 2 ऑगस्ट 2026 रोजी ट्रक चिखलातून बाहेर काढण्यात वन विभागाला यश आल्याचे सांगण्यात येते. फसलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी 4 दिवस लागणे, एकाही आरोपीला अटक न होणे, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांच्याकडून या प्रकरणातील पुढील कारवाईबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करणे यामुळे एकूणच या कारवाईबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तस्करांची एवढी हिंमत कशी?
मोठ्या ट्रकमधून सागवानाची अनेक झाडं कापून दक्षिणेकडील राज्यांमध्ये घेऊन जाण्याची हिंमत कोणी कसा करू शकतो? वनतस्करांना संबंधित वनअधिकाऱ्याचे छुपे सहकार्य तर नाही ना, अशा विविध शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. यासंदर्भात वनविभागाने अद्यापपर्यंत कोणतेही अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढलेले नाही. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एवढी मोठी वनतस्करी उघडकीस येऊनही अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ म्हणतात, तस्करांची नावे कळली
कारवाईदरम्यान 15 ते 16 संशयित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी एकही आरोपी वनविभागाच्या पथकाच्या हाती लागला नाही. यासंदर्भात उपवनसंरक्षक शैलेष मिना यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून तस्करांची लिंक लागली आहे. अनेक आरोपींची नावेही समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित सर्व आरोपींना अटक कधी होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
































