गडचिरोलीत गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी व उपचार

'वुई केअर अॅन्ड क्युअर' मोहीम

गडचिरोली : महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने ‘We Care & Cure’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची पूर्वलक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून तिचा शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यापासून करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक तथा एचपीव्ही व्हॅक्सिनेशन, सर्व्हायकल आणि ब्रेस्ट कॅन्सर कमिटी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ.वर्षा लहाडे आणि डॉ.ज्योती सूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मंगेश चिवटे (ओएसडी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष), डॉ.शशीकांत शंभरकर (उपसंचालक, नागपूर), डॉ.मंजुषा गिरी (अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र), डॉ.संतोष कुलकर्णी आणि डॉ.विक्रांत देसाई (सचिव, आयएमए) यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) सहभाग नोंदवला.

जागरूकता आणि आवाहन

डॉ.मंजुषा गिरी यांनी महिलांना आवाहन केले की, गर्भाशय मुखाचा कर्करोग योग्य वेळी निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यामुळे महिलांनी भिती किंवा लाज न बाळगता नियमित तपासणी करून घ्यावी. तसेच, डॉ.वर्षा लहाडे यांनी सांगितले की, ही संकल्पना प्रत्येक रुग्णाला संवेदनशील, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर आरोग्य सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहे.

उपचारात्मक कार्यवाही

या शिबिरामध्ये गडचिरोली, चामोर्शी, धानोरा आणि आरमोरी येथील 13 व्हीआयए पॉझिटिव्ह महिलांची तपासणी करून त्यांच्यावर डॉ.वर्षा लहाडे आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रशांत आखाडे यांच्या देखरेखीखाली यशस्वी उपचार करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रेरणा राऊत यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ.छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी केले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.