Home पब्लिक प्रॉब्लेम आष्टीकरांच्या मागणीला बगल देत घोटमध्ये अपर तहसील कार्यालय !

आष्टीकरांच्या मागणीला बगल देत घोटमध्ये अपर तहसील कार्यालय !

30 नोव्हेंबरला 'रास्ता रोको'चा इशारा

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या आष्टी येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या आश्वासनाला आणि जनभावनेला डावलून घोट येथे अप्पर तहसील कार्यालय होणार असल्याची माहिती समोर आल्याने आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात येत्या 30 नोव्हेंबरला ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

चामोर्शी तालुक्यासाठी मंजूर असलेले अप्पर तहसील कार्यालय घोट येथे कार्यान्वित करण्याचा आदेश 23 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. हा आदेश निर्गमित होताच आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. 24 नोव्हेंबर रोजी आष्टी येथील ग्रामपंचायत सभागृहात आष्टी परिसरातील नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन शासन निर्णयाचा निषेध नोंदवला. हा आदेश तातडीने स्थगित करून आष्टी येथे मंजूर अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यात यावे, अन्यथा 30 नोव्हेंबर रोजी आष्टी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

याबद्दल माहिती देताना नागरिकांनी सांगितले की, आष्टी तालुक्याची मागणी 35 वर्षापासून असून 1992 रोजी गडचिरोली जिल्ह्यात नवीन तालुके निर्माण करताना आष्टीचे नाव अग्रस्थानी होते. मात्र राजकीय दबावाखाली ते डावलून मुलचेरा येथे तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरही सातत्याने आष्टी तालुक्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला.

शासनाने राज्यात नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्माण करताना भौगोलिक स्थिती, कामाचा व्याप, लोकसंख्या, नागरीकरण, दळणवळणाच्या सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण सुविधा आदी निकष विचारत घेत आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले. मात्र 22 सप्टेंबर रोजी अप्पर तहसील कार्यालयाचा कार्यान्वित आदेश काढण्यात आला नाही.

याविरोधात आष्टी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली व शासनातील विविध विभागाच्या मंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी आष्टी अप्पर तहसील कार्यालयासंबंधी सकारात्मक व न्यायपूर्ण निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र 24 नोव्हेंबर ला शासनाने आदेश निर्गमित करत आष्टी अप्पर तहसील कार्यालयाला वगळले व घोट येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केल्याचा आदेश काढला. आष्टी महसूल मंडळातील गावांना यात जोडण्यात आले.

आष्टी हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, आष्टी व परिसरातील गावांचे अंतर तालुका मुख्यालयापासून 45 ते 50 किलोमीटर आहे , ग्रामीण रुग्णालय आहे, राष्ट्रीयकृत बँका, शाळा, महाविद्यालये, दळणवळणाच्या सोयी सुविधा, मोठी बाजारपेठ, पोलीस ठाणे आदींची सुविधा, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आठ नगरपंचायतीपेक्षा जास्त लोकसंख्या असताना, अप्पर तहसील कार्यालयासाठी आवश्यक ते सर्व निकष पूर्ण करत असताना आष्टी येथे मंजूर तहसील कार्यालय वगळून, घोट येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले, अशी आष्टीकरांची खंत आहे.

आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये अन्यायाची भावना बळावत आहे. याविरोधात मोठे जनआंदोलन उभे करून 30 नोव्हेंबर रोजी आष्टीच्या मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर आष्टी येथील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, नंदा कुलसंगे, रेश्मा फुलझेले, पूनम बावणे, वर्षा कलाक्षपवार, विनोद दुर्गे, विजय बहिरेवार, रामचंद्र बामनकर, पराग गोनपल्लीवार, अनिल आलूरवार, विजय बद्दलवार, नंदू सिडाम, वसंत चौधरी, कपिल पाल, संतोष बारापत्रे, छोटू दुर्गे, रमेश बोरकुटे यांच्यासह आष्टी, इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, अनखोडा, कढोली, उमरी, मार्कंडा कंसोबा, चौडमपल्ली, चपराळा आदी गावांचे सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.