Home दैनंदिन बातम्या अंगणवाड्या बळकटीकरणासाठी 16 कोटींचा प्रस्तावित प्रकल्प

अंगणवाड्या बळकटीकरणासाठी 16 कोटींचा प्रस्तावित प्रकल्प

पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणार

गडचिरोली : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील पूर्व प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद गडचिरोली आणि क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 16 कोटी रुपये आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण करणे, बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.

‘गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा यंत्रणेद्वारे पूर्व बाल्यावस्थेतील शिक्षणाचे बळकटीकरण’ या नावाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा ट्रस्ट, सीएसआर निधी तसेच अन्य बाह्य भागीदारांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे नियोजन आहे. निधीची उपलब्धता आणि शासनाच्या प्रचलित नियमांच्या अधीन राहून प्रकल्प राबविण्यास जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सहमती दिली आहे.

जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडी शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून, दोन वर्षांनंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष फलनिष्पत्तीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.