एक्साईज विभागाने राहत्या घरातून जप्त केली एक लाखाची दारू

पावी मुरांडा येथील कारवाई

गडचिरोली : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. याअंतर्गत पावी मुरांडा येथील श्रीकृष्ण पत्रू चापडे याच्या राहत्या घरी छापा मारून 1 लाख 5 हजार 360 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचासह पावी मुरांडा येथील चापडे याच्या घरी छापा मारला. यावेळी घरातून 4 खाकी खरड्याच्या खोक्यात रॅायल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या 180 मिली मापाच्या 192 सिलबंद बाटल्या, 3 खाकी खरड्याच्या खोक्यात हॅावर्ड स्ट्र्राँग बिअरच्या 72 टिन कॅन, 12 खाकी खरड्याच्या खोक्यात रॅाकेट देशी दारूच्या 1200 सिलबंद बाटल्या असा एकूण 1 लाख 5360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत आरोपी श्रीकृष्ण चापडे याच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्र.निरीक्षक शु.ले.चौधरी, दुय्यम निरीक्षक चं.वि.भगत, तसेच वि.पु.शेंदरे, श्री.रा.सुरजुसे आदींनी केली. पुढील तपास दु.निरीक्षक चं.वि.भगत करीत आहे.