गडचिरोली : होळीनिमित्त पोटेगाव भागातील छोट्या दारू विक्रेत्यांना छुप्या मार्गाने दारू पोहोचविण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत एका टाटा हॅरिअर गाडीसह 4 लाखांची विदेशी दारू जप्त केली.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, आरोपी अजय चिचघरे रा.खरपुंडी, ता.जि.गडचिरोली हा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने टाटा हॅरिअर या वाहनातून (यु.पी.16, डी.बी.0590) पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील अवैध चिल्लर विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करणार होता. यावरून पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नवरगाव येथील रहिवासी श्यामराव अलीवार यांच्या राहत्या घरासमोर सापळा रचला.
यावेळी संबंधित वाहन येत असताना पोलीस पथकाने अडथळा निर्माण करून वाहनास थांबण्याचा ईशारा केला, परंतु चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि त्यातील 2 इसम उतरून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
यानंतर त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात रॉयल स्टॅग डिलक्स बिअर कंपनीचे 22 खरड्याचे बॉक्स (एकूण किंमत 3,16,800 रुपये), 90 मिली मापाचे रॉयल स्टॅग डिलक्स कंपनीचे 100 नग सिलबंद काचेच्या बॉटल (किंमत 15,000 रुपये), आणि एक लीटर मापाचे 23 नग सिलबंद काचेच्या बॉटल (किंमत 46,000 रुपये), तसेच हॅावर्ड 5000 प्रिमिअम स्टोअर बिअर कंपनीचे 6 सिलबंद खरड्याचे बॉक्स (43,200 रुपये), आणि दारु वाहतुक करण्यासाठी वापरलेली एक पांढऱ्या रंगाची टाटा हॅरिअर गाडी (किंमत 8,00,000 रुपये) असा एकूण 12 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी अजय चिचघरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पळून गेलेल्या दोघांचा शोध घेणे सुरु आहे. पुढील तपास पोउपनि.सीमा किंकर, (पोमके पोटेगाव) करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि समाधान दौड, पोअं/रोहीत गोंगले, प्रशांत गरफडे, रामदास उईनवार यांनी पार पाडली.
































