गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सिरोंचा भागातील काही नागरिकांसह शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (अहेरी), जिल्हा जलसंपदा विभाग, तहसीलदार (सिरोंचा) आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सोमनूर संगमाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था दूर करून पर्यटकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी आसरअल्ली ते सोमनूर संगम या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
सिरोंचा तालुक्याचा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सिरोंचा येथे स्वतंत्र बस आगार निर्माण करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
याशिवाय मेडीगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन दरवर्षी पाण्याखाली जात असून मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप (कपात) होत आहे. या गंभीर समस्येवर चर्चा करून, बाधित क्षेत्राचे त्वरित पुनर्सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांमुळे सिरोंचा तालुक्यातील रस्ते, दळणवळण आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा तालुक्यातील शेतकरी सूरज दुदीवार, राम रंगुवार आणि तिरुपती मुद्दाम यांनी व्यक्त केली.
































