गडचिरोली : आदिवासी क्षेत्रातील आलापल्लीच्या विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला उत्कृष्ट आयटीआय म्हणून उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. मुंबईतील राजभवनात झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह इतर अधिकारीगण उपस्थित होते.
संस्थेचे प्राचार्य वैभव बोंगीरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासोबत त्याच संस्थेचे आदिवासी वेशभूषेतील प्रशिक्षणार्थीही उपस्थित होते.
आलापल्लीच्या या आयटीआयमधून प्रशिक्षित 78 जणांना आतापर्यंत लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये नियमित रोजगार मिळाला आहे. उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेंतर्गत जवळपास 3 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली असून जवळपास 16 लाख रुपये इतका एकूण महसूल शासनास प्राप्त झाला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्यात एनएसएस अंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी व पोयरकोठी येथील पूरपीडित अंदाजे 200 घरांचे इलेक्ट्रिफिकेशन करून देण्यात आले. त्यामुळे संस्थेला उत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
































