
गडचिरोली : रुग्णवाहिका म्हटले की नजरेसमोर स्ट्रेचरवरील रुग्ण दिसायला लागतो. त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याने जात असताना लोक बाजुला होऊन रुग्णवाहिकेला आधी वाट मोकळी करून देतात. पण जिल्ह्याच्या आष्टी भागात एक रुग्णवाहिका चक्क रुग्णाऐवजी दारूच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आष्टी पोलिसांनी त्या रुग्णवाहिकेच्या चालकासह एका सहकाऱ्याला अटक केली आहे. याशिवाय त्या वाहनातील 8 लाख 28 हजार रुपयांची दारू आणि 5 लाख रुपये किमतीचे ते वाहन जप्त करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, आष्टी येथील महात्मा फुले महाविद्यालयाजवळ एका रुग्णवाहिकेमधून अवैध प्रकारे दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संध्याकाळच्या वेळी सापळा रचत ‘ॲम्बुलन्स’ लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको (क्रमांक एम एच 34, बी आर 5753) या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची देशी-विदेशी दारू असल्याचे दिसून आले.
या कारवाईत विविध प्रकारची 8 लाख 28 हजार 800 रुपयांची दारू आणि अंदाजे 4 लाख रुपयांचे वाहन, असा एकूण 12 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त केला. या घटनेतील आरोपी सुलतान मोहम्मद शेख व सौरभ चंदू गायकवाड हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्य्क पोलीस निरीक्षक मदन मस्के करीत आहे. ॲम्बुलन्स लिहिलेली सदर रुग्णवाहिका कुणाची आहे, याचा तपास करून त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
































