Home पब्लिक प्रॉब्लेम नसबंदी उघडण्याच्या शस्रक्रियेने आत्मसमर्पितांच्या घरी हलणार पाळणा

नसबंदी उघडण्याच्या शस्रक्रियेने आत्मसमर्पितांच्या घरी हलणार पाळणा

आतापर्यंत 13 जणांना अपत्यप्राप्ती

गडचिरोली : माओवादी संघटनेत काम करताना सदस्यांची नसबंदी केली जाते. पण पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून माओवादी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर नवीन आयुष्याची सुरूवात करताना कौटुंबिक जीवन अधिक सुखकर करण्यासाठी नसबंदी पुन्हा उघडण्याची शस्रक्रिया केली जात आहे. गडचिरोली पोलीस दल आणि सर्च फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 14 आत्मसमर्पितांवर ही शस्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. यापूर्वी नसबंदी शस्रक्रिया झालेल्या 13 दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊन त्यांच्या घरी पाळणा हलला आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आतापर्यत एकूण 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्रक्रिया करण्यात आली. आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात येणे सुलभ होण्यासाठी आरोग्य, प्रशिक्षण, रोजगार या विविध आयामांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माँ दंतेश्र्वरी रुग्णालय चातगाव येथे ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत दिनांक 21 मार्च 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्रात आत्मसमर्पण केलेल्या 13 आणि गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या एका अशा एकूण 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओेपनिंग शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना 24 मार्च रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

माओवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या आत्मसमर्पितांना स्थिर व सुरक्षित कौंटुबिक जीवन जगता यावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. संबंधित आत्मसमर्पित माओवाद्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर सुरक्षित वातावरणात शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपक्रमामुळे आत्मसमर्पितांचे कौटुंबिक आयुष्य व आरोग्यामध्ये सुधारणा होऊन त्यांच्या पुनर्वसनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात आला आहे.

सदर शस्त्रक्रिया सर्च फाऊंडेशन गडचिरोलीचे पद्मश्री डॉ.अभय बंग, पद्मश्री डॉ.राणी बंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लीलावती रुग्णालय मुंबई येथील डॉ.श्रीरंग पुरोहित, डॉ.सुशिल नेहेते, डॉ.लीना जैन, डॉ.वर्षा बारई, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे डॉ.नागसेन साखरे यांनी पार पाडल्या.

शस्रक्रिया झालेल्यांना झाली अपत्ये

यापूर्वी नसबंदी रिओपनिंगची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या एकूण 36 माओवादी सदस्यांपैकी एकूण 13 माओवादी सदस्यांना आतापर्यंत अपत्य प्राप्त झाले आहे. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठीचे चार स्वतंत्र व सुसज्ज रो-हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर असून एकूण 72 जणांना लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड येथे कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

आत्मसमर्पितांना विविध लाभ

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मिळणा­ऱ्या बक्षीस रकमेचे सुलभ वितरण, भूखंड मिळवून देऊन प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारणे, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी ओळखपत्रे उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण जसे मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन इ., लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लि.सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर, टेक्निशियन, ऑपरेटर इ. प्रशिक्षण व रोजगाराची संधी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना, वैद्यकीय मदत – डोळ्यांच्या उपचारासाठी “ऑपरेशन रोशनी”, तसेच नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, मानसिक व सामाजिक विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार व ध्यान शिबिरे, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरिता सामूहिक विवाह सोहळा व इतर योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

प्रोजेक्ट संजीवनी हा उपक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.नरेंद्र पिवाल, पोउपनि.संतोष कोळी व अंमलदार यांच्याकडून पार पाडला जात आहे.