Home दैनंदिन बातम्या पुलखल येथे भागवत सप्ताहाचा भक्तीमय वातावरणात समारोप

पुलखल येथे भागवत सप्ताहाचा भक्तीमय वातावरणात समारोप

डॉ.अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : शहरालगतच्या पुलखल येथे श्रीराम जन्मोत्सव पर्वानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाचा समारोप अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण आठवडाभर गाव परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पुलखल ग्रामस्थांच्या वतीने अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या आवारात आयोजित या भागवत सप्ताहात प्रवचनकार विजयानंद महाराज रोळे यांच्या प्रभावी वाणीमुळे भाविक भक्तीरसात तल्लीन झाले होते. त्यांच्या प्रवचनातून अध्यात्म, संस्कार आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या समारोपीय सोहळ्याला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी व्यासपीठाचे दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि समाजजीवनात अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विशेषतः ग्रामीण भागात आयोजित होणारे भागवत सप्ताह हे तरुण पिढीला योग्य दिशा देणारे ठरतात. संस्कार, शिस्त आणि नैतिकतेची जाणीव या माध्यमातून अधिक दृढ होते, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी सामाजिक नेते प्रदीप महाराज, सरपंच सावित्री गेडाम, प्रफुल्ल बिजवे, भाजपा नेत्या सुमन ठाकरे, युवा नेते प्रशांत कोटगले यांच्यासह पुलखल गावातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.