Home दैनंदिन बातम्या लॅायड्सकडून युवक-युवतींच्या कौशल्य विकासाला मिळाले बळ

लॅायड्सकडून युवक-युवतींच्या कौशल्य विकासाला मिळाले बळ

ड्रायव्हिंग स्कूलही सुरू करणार

प्रशिक्षणात प्राविण्य मिळवणाऱ्यांना सन्मानित करताना सीईओ सुहास गाडे, एमडी बी.प्रभाकरन

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या उपक्रमात गुरूवारी (दि.26) दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी निवासी संचालक हिम्मत सिंह, कार्यकारी संचालक एस.वेंकटेश्वरन, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात 28 जानेवारी ते 26 मार्च यादरम्यान 255 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे गडचिरोलीसारख्या क्षमतायुक्त, पण कौशल्य प्रशिक्षणाच्या मर्यादित संधी असलेल्या भागात सकारात्मक बदल घडत आहे.

विविध कंपन्यांमध्ये ज्या कौशल्याची गरज असते ते वेल्डिंग, इलेक्ट्रिकल कामे, वेअरहाऊस ऑपरेशन्स, ड्रायव्हिंग, फूड अँड बेव्हरेज सेवा, हाऊसकिपिंग आणि रिटेल यांसारख्या विविध क्षेत्रातील प्रशिक्षण लॅायड्सकडून दिले जाते. अवघे 12 वी शिक्षण घेतलेले युवक-युवती या प्रशिक्षणातून नोकरी मिळवत आहेत.

26 जानेवारी 2026 रोजी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या पहिल्या बॅचमधील 527 उमेदवारांना 100 टक्के प्लेसमेंट मिळाले आहे हे विशेष. प्रशिक्षण पूर्ण होताच अप्रेंटिसशिप नियुक्तीपत्र देऊन शिक्षणातून रोजगाराकडे सहज संक्रमण सुनिश्चित केले जाते.

एकल महिलांना देणार प्रशिक्षण

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी लॅायड्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील एकल महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम होण्याची संधी देण्याची सूचना त्यांनी केली. व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन म्हणाले, ‘ही संस्था गडचिरोलीच्या समृद्ध आणि विकसित भविष्यासाठी पायाभरणी करते. आमचे उद्दिष्ट केवळ शिक्षित नव्हे तर अत्यंत कुशल मनुष्यबळ तयार करणे आहे.

आतापर्यंत लॉयड्सने 2000 पेक्षा अधिक कुशल कामगार तयार केले आहेत. यानंतर अत्याधुनिक असे ड्रायव्हिंग स्कूल सुरू करून महिलांना मोठी वाहने चालविण्यासाठी सक्षम करणार असल्याचे प्रभाकरन म्हणाले. गडचिरोलीचा विकास हा येथील लोकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. आमची दृष्टी केवळ औद्योगिक मॉडेलची पुनरावृत्ती करण्याची नसून स्थानिक सक्षमीकरणावर आधारित ‘नवीन जमशेदपूर’ निर्माण करण्याची असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजीत संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.