Home दैनंदिन बातम्या शोभायात्रांनी दुमदुमले गडचिरोली, आलापल्लीत धर्मरावबाबा सहभागी

शोभायात्रांनी दुमदुमले गडचिरोली, आलापल्लीत धर्मरावबाबा सहभागी

डॅा.नेते, डॅा.नरोटेंकडून महाप्रसाद

गडचिरोलीत साकारलेली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली

आलापल्लीच्या शाभायात्रेतील रथाचे पुजन करताना आ.धर्मरावबाबा आत्राम
कर्तव्य पथ या कार्यालयासमोर सपत्निक महाप्रसादाचे वितरण करताना आ.डॅा.मिलिंद नरोटे
वीर सावरकर चौकाच्या नामफलकाचे अनावरण करताना मा.खा.डॅा. अशोक नेते, सोबत परिसरातील नागरिक.

गडचिरोली : मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव गडचिरोली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोलीत संध्याकाळी अनेक भागातून वेगवेगळ्या शोभायात्रा काढण्यात आल्या. आलापल्ली येथील शोभायात्रा आकर्षक आणि शिस्तबद्ध होती. त्यात आ.धर्मरावबाबा आत्राम यांनीही सहभागी होऊन उत्साह वाढविला. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात उभारलेली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती आणि त्यातील अयोध्येतील मूर्तीप्रमाणेच दिसणारी श्रीरामाची मूर्ती भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाली होती.

गडचिरोलीत ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते. माजी खासदार डॅा.अशोक नेते, आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनीही अनेक ठिकाणच्या उत्सव मंडपांना भेटी देऊन स्वत: महाप्रसादाचे वाटप केले.

श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून आ.डॅा.नरोटे यांच्या ‘कर्तव्य कक्ष’ या कार्यालयात पुजन करून रामभक्तांसाठी ‘महाप्रसादाचे’ वाटप करण्यात आले. यात डॅा.नरोटे यांनी सपत्निक सहभाग घेऊन प्रसादाचे वाटप केले.

महाप्रसादाचे वितरण व सावरकर चौकाचे नामकरण!

गडचिरोली शहरात श्रीराम नवमीनिमित्त आयोजित रामनगरातील सोहळ्यात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित राहून विधीवत पूजा-अर्चा आणि आरती केली. या कार्यक्रमात महिला मंडळाने सादर केलेल्या भजन-कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी डॉ.नेते यांनी स्वतः भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.

दरम्यान या मंगलदिनी मा.खा.डॅ्ा.नेते यांच्या निवासस्थानाजवळील प्रमुख चौकाचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ असे नामकरण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे प्रखर विचार मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने चौक ओळखला जाणार असल्याने नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. यामध्ये नरेंद्र बोरकर, नंदू कुमरे, शंकर माकडे, पवन गेडाम, मनोज मारगोनवार, अरुण कतलपवार, रविंद्र निंबोरकर, भाऊ श्रीपदवार, मारोती कुनघाडकर, माधुरी मैद, रजनी वानखेडे, विद्या बोरकर, निता कतलपवार, ताई उरकुडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आलापल्लीत भव्य शोभायात्रा

जिल्ह्याच्या दक्षिण भागाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या आलापल्ली येथे सण-उत्सव जल्लोषात साजरे करण्याची परंपरा आहे. यात गुरूवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी श्रीरामाचे विधिवत पुजन केले.

शेकडो युवक-युवती, नागरिक भगवे ध्वज आणि फेटे घालून शोभायात्रेत सहभागी झाले होते. राम मंदिरातून निघालेली ही यात्रा वीर बाबूराव चौक, बस स्टँड चौक, श्रीराम चौक आणि वि.दा. सावरकर चौकापर्यंत फिरली. ठिकठिकाणी आलापल्लीकरांनी शोभायात्रेचे स्वागत केले. डिजेवरील गितांच्या तालावर महिला-पुरुष, युवक-युवती थिरकत होते. चिमुकल्यांनी लेझिमने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सजवलेल्या रथरूपी वाहनात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभुषेतील बालकांनी लक्ष वेधून घेतले. हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.