अहेरी : शहरातील घनकचरा व्यवस्थापन गेल्या 8 दिवसांपासून ठप्प झाले आहे. जुन्या कंत्राटदाराची मुदत ३० एप्रिल रोजी संपल्याने आणि सत्ताधाऱ्यांनी समोरील योग्य नियोजन न करता 27 एप्रिलचा विशेष सभेतील हेकेखोर भूमिकेमुळे कचरा संकलनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. अहेरी शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. पावसाळा समोर असूनही नाल्याची साफसफाई बंद झाल्याने अहेरीकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहें. शिवाय अनेक सफाई कामगार घरी बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत भाजपचे नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिजित सोनावणे यांनी भेट घेत एक निवेदन सादर केले. येत्या 4 दिवसांत अहेरी शहरात कचरा संकलन पूर्ववत सुरु करावे, अन्यथा सफाई कामगारांना सोबत घेत नगरपंचायत कार्यालयातच शहरातील कचरा टाकून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मुख्याधिकारी सोनावणे यांनी मागणीला प्रतिसाद देत लवकरच नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवकांची तातडीची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन ही समस्या त्वरित सोडवू असे आश्वासन दिले. त्यामुळे अहेरी शहरात कचरा संकलन सुरु होऊन मोठी समस्या सुटेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
































