गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून आजच्या स्थितीत पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. अशा स्थितीत आपल्या मूळ जिल्ह्यात आणि मूळ गावी जाऊन नव्याने आयुष्याची दिशा निश्चित करून तिथे स्थिरावण्यासाठी 50 आत्मसमर्पित माओवाद्यांना निरोप देण्यात आला. गडचिरोली पोलिसांकडून त्यांचे त्यांच्या मूळ गावी सुरक्षित पुनर्वसन केले जात आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवादी विरोधी अभियानांसोबतच शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांनी अहिंसेचा मार्ग स्विकारत आत्मसमर्पण केले आहे. तेव्हापासून ते गडचिरोलीतील आत्मसमर्पितांच्या नवजीवन वसाहतीत राहात होते. त्यापैकी एकूण 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्य त्यांच्या मूळ जिल्ह्रात परत जाण्यास ईच्छुक असल्याने त्यांना सोमवारी (दि.31) भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवाद्यांना आतापर्यंत विविध प्रकारची मदत देण्यात आली आहे. आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करुन आत्मनिर्भर बनावे, कुटुंबियांसोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पूढे जावे. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबध्द असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमप्रसंगी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी देखिल आपले मनोगत व्यक्त करुन पोलीस दलाने वेळोवेळी सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला माजी नक्षल नेता भूपती याच्यासह अनेक वरिष्ठ कॅडरचे आत्मसमर्पित माओवादी सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक (धानोरा) सुयशकुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक (भामरागड) सागर भामरे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.नरेंद्र पिवाल व अंमलदारांनी परिश्रम घेतले.
आतापर्यंत 819 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 819 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पणानंतर त्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, तसेच पुनर्वसनासाठी विविध रोजगार, स्वयंरोजगार, प्रशिक्षणाचा लाभ यांचा समावेश आहे.
पुनर्वसनासाठी पोलिसांचा पुढाकार
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे व नसबंदी रि-ओपनिंग यासारख्या आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आली. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करून 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. 88 आत्मसमर्पित माओवाद्यांना लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेड कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
































