गडचिरोली : छत्तीसगड सीमेकडे जाणाऱ्या मार्गावर दुर्गम भागातील कोठी–कोरनार पूल अल्पवधीत कोसळण्याच्या प्रकरणात होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद आणि बिरसा ब्रिगेड यांनी सक्रिय पाठिंबा देत सरकार व प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाना साधत प्रशासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. ज्या पुलाचे उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री करतात, त्याच पुलामध्ये अवघ्या 3 वर्षांत निकृष्ट बांधकामाचा प्रकार उघडकीस येतो, 20 दिवस उलटूनही जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही; त्यामुळे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहे का, असा सवाल करण्यात आला. एकीकडे जपतलाई आश्रमशाळेच्या दुर्घटनेत 24 तासांत कारवाई होते; मग या प्रकरणात कारवाई का नाही? संबंधित संस्था काँग्रेसशी संबंधित असल्यामुळे सरकारने वेगळी भूमिका घेतली का, असा खोचक प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनाचे नेतृत्व आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, हंसराज उराडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे आणि बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश वरखडे यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्तराने आंदोलक असमाधानी
दरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु त्यांच्या वतीने यासंदर्भात कोणताही अहवाल, प्रस्ताव किंवा पत्रव्यवहार सरकारशी झालेला नाही, असे सांगितले. ठोस कोणतेही उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नाही. पण आंदोलनानंतर आता वरिष्ठ प्रशासनाशी चर्चा करून अहवाल देतोय असे सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करत ते बाहेर पडले.
































