Home राजकीय घडामोडी गडचिरोलीत भाजपा महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात

गडचिरोलीत भाजपा महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात

मा.खा.नेते, अल्का आत्राम यांचे मार्गदर्शन

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठक आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करणे तसेच भाजपची ध्येयधोरणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री तथा विदर्भ प्रदेश प्रभारी अल्का आत्राम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, तसेच डॉ.चंदा कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष तथा न.प.सभापती सीमा कन्नमवार, जिल्हा प्रभारी तथा जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, माजी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हा महामंत्री लता पुन्घाटे, जिल्हा महामंत्री अर्चना बोरकुटे, जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, जिल्हा महामंत्री शालिनी पोहणेकर यांच्यासह महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांच्या सहभागातून संघटन अधिक मजबूत करा – डॉ.नेते

या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी महिला संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. आज महिलांना राजकारणासह सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विविध क्षेत्रांत नेतृत्वाची संधी उपलब्ध होत असून, महिलांनी या संधीचा उपयोग करून संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांचे नेतृत्व अधिक प्रभावी करण्यासाठी पक्षातील सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेदभाव न करता एकत्रितपणे, एकजुटीने आणि पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करावे, असे आवाहनही डॉ. नेते यांनी केले. संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असून, सामूहिक प्रयत्नांतूनच पक्ष संघटना अधिक सक्षम होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

महिला सशक्तीकरणासोबत संघटनवाढीवर भर– अल्का आत्राम

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री तथा विदर्भ प्रदेश प्रभारी अल्का आत्राम यांनी महिला सशक्तीकरण, संघटनवाढ आणि आगामी कार्ययोजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येऊन पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले.

“महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहेत. पक्षाचे पद स्वीकारल्यानंतर कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा भेदाभेद न करता पक्षहिताला प्राधान्य देत संघटनेचे काम सातत्याने करावे. पदाधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे,” असे प्रतिपादन अल्काताई यांनी केले.

यावेळी आगामी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी आपल्या लाडक्या बहिणींच्या नेहमी पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे राज्याचे मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांना राखी पाठवावी, असे आवाहनही अल्का आत्राम यांनी केले.

या बैठकीमुळे भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला असून आगामी काळात महिला संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे विचार, ध्येयधोरणे आणि विकासाभिमुख कार्य जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.