गडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सुविधा सहज मिळाव्यात आणि प्रशासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी 6 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. यामुळे स्थानिक शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना साध्या कामांसाठी दूरवरच्या तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात जावे लागणार नाही.
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागाला मोठा दिलासा
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेला शासकीय सेवा जलद गतीने मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये 6 नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येत आहेत.
त्यात कुरखेडा तालुक्यात मालेवाडा येथे, आरमोरी तालुक्यात वैरागड येथे, धानोरा तालु्क्यात पेंढरी, सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली, एटापल्ली तालुक्यात कसनसूर, तर अहेरी तालुक्यात जिमलगट्टा येथे हे अपर तहसीलदार कार्यालये राहणार आहेत.
या कार्यालयांमुळे नागरिकांना जमिनीचे फेरफार, विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना आणि इतर महसुली सेवा त्वरित मिळतील. सुरुवातीला ही कार्यालये तात्पुरत्या इमारतींमध्ये सुरू केली जाणार असून, कायमस्वरूपी बांधकामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवांचा लाभ सहज व जलद मिळावा यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. या नवीन कार्यालयांमुळे जनतेचा वेळ आणि प्रवासखर्च वाचेल, तसेच प्रशासकीय कामांना मोठी गती मिळेल, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
































