गडचिरोली : प्रकाशपर्व दीपावलीला जेव्हा लक्ष-लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला होता, तेव्हाच अजब-गजब विचार मंचाच्या सांज मैफिलीत सप्तसुरांचे दिवे उजळले. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ फेम हर्षद गोळेसर आणि दुहिता गोळेसर या जोडीने आपल्या अनोख्या, लाघवी शैलीत अवीट गोडीची गीते सादर करत गडचिरोलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरू असतानाही रसिक श्रोत्यांनी भरगच्च उपस्थिती लावून आपल्यातील कलाप्रेमाचा प्रत्यय दिला. (खाली वाचा)


खास दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून गडचिरोलीतील ‘अजब-गजब विचार मंच’च्या वतीने यंदाही ‘संगीत महोत्सव 2026 (पर्व-13)’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दोन विशेष सांगीतिक मैफली रंगल्या. (खाली वाचा)

स्थानिक विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात महोत्सवाचा पहिला कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी पार पडला. ‘दीपावली सांध्य मैफिल’ या कार्यक्रमात हर्षद आणि दुहिता यांनी आपल्या गायनाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या मैफिलीची सुरुवात ‘गणनायका, गजमुखा…’ आणि ‘शंकर संकट हरणा…’ या वंदनेने झाली. त्यानंतर हर्षद-दुहिताच्या जोडीने एकापाठोपाठ एक सरस गीते सादर केली. ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी, ‘या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे’, ‘नको करू सखी असा साजरा शृंगार’, ‘लाजून हसणे अन हासून ते पाहणे’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’, ही गीते ऐकताना रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट होत होता. (खाली वाचा)

हर्षद नाशिकचा तर दुहिता मुंबईची. त्यांच्या चक्क आठ वर्षांच्या प्रेमाची परीणती अखेर परिणयात म्हणजे लग्नात झाली. सूरमयी जीवन जगणाऱ्या या सुरेल दाम्पत्याने रसिकांची मने जिंकली. त्यांची जुगलबंदी रसिकांना विशेष भावली. (खाली वाचा)

‘हाय रामा ये क्या हुआ’, ‘जीव रंगला दंगला’, ‘नयना ठग लेंगे’, ‘रमता जोगी’, ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा, ‘मी डोलकर डोलकर…’ या गीतांवर प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. मैफिलीचे सूत्रसंचालन किशोर गलांडे आणि आसावरी गलांडे-देशपांडे यांनी खुमासदार शैलीत केले. त्यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. (खाली वाचा)

या उपक्रमासाठी अजब-गजब विचारमंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, चेतन गोरे, दत्तू सूत्रपवार, सुभाष धंदरे, सतीश विधाते, प्रवीण खडसे, विश्राम होकम, अरविंद कात्रटवार, तन्मय त्रिनगरीवार, डॅा.चेतन कोवे, सतीश चिचघरे, डॅा.नागुलवार, डॅा.धम्मदीप बोदेले, अंकित गव्हारे, पराग वासेकर, पुरुषोत्तम ठाकरे, प्रतीक बारशिंगे, नंदकिशोर काथवटे, मिलिंद उमरे, प्रसाद पवार, मधुर हेमके व त्यांच्या संपूर्ण चमूने सहकार्य केले. (खाली वाचा)

या कार्यक्रमादरम्यान काही वेळच अगदी मोजकी गीते सादर करणारी ‘सूर नवा ध्यास नवा’ची विजेती प्रख्यात गायिका सन्मिता धापटे-शिंदे हिच्या सुरांचा मोहक आविष्कार रसिकांना पर्वणी ठरला. (खाली वाचा)

‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए’ ही गझल, ‘रेशमाच्या रेघांनी’ या लावणीने आणि ‘अंबाबाईचा गोंधळ’ सारखे भक्तिगीत, ‘मेरे ढोलना सुन’ हे वेगळ्या धाटणीचं सुरेल गीत आणि ‘सैराट झालं जी’ या तिच्या खास शैलीतील गीतांनी मैफिलीत रंग भरले.





































