Home दैनंदिन बातम्या चार दशकानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात नक्षलमु्क्त वातावरणात झाली दिवाळी

चार दशकानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात नक्षलमु्क्त वातावरणात झाली दिवाळी

पोलिसांकडून ठिकठिकाणी कार्यक्रम

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या नवजीवन वसाहतीत मुलांसोबत फटाके फोडताना पोलीस अधिकारीगण.
बिनागुंडा येथील मुलांना दिवाळी भेट देताना पोलीस अधीक्षक एम.रमेश व इतर अधिकारीगण.
गर्देवाडा येथे नागरिकांना दिवाळी भेट देताना एएसपी कार्तिक मधिरा
जिमलगट्टा ठाण्यात गावातील मुलांना दिवाळी भेट देताना एएसपी हर्षवर्धन बी.जे.

गडचिरोली : गेल्या चार दशकांची माओवादी दहशत गडचिरोली पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर जिल्ह्याच्या दुर्गम भागात पहिल्यांदा दिवाळीसारखा सर्वात मोठा सण अतिशय मोकळ्या आणि दहशतमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून संवेदनशिल-अतिसंवेदनशिल क्षेत्र म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या भागात स्थानिक नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. (खाली वाचा)

पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी बिनागुंडा येथे उभारलेल्या पोलीस मदत केंद्रात पोहोचून तेथील जवान आणि नागरिकांना फराळाचे वाटप केले. याशिवाय इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशन आणि मदत केंद्रांमध्ये नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. विविध सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना दिवाळीनिमित्त अन्नधान्य व फराळाचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व 70 पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये याच पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. (खाली वाचा)

मे 2026 मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’च्या यशानंतर गडचिरोली जिल्ह्यातून 4 दशकांची माओवादी दहशत पूर्णपणे संपली. त्यानंतर जंगलात काही ठिकाणी शिल्लक असलेली माओवाद्यांनी बनविलेली स्मारकेही तोडण्यात आली. याशिवाय आता माओवाद्यांनी घातपाती कारवाया करण्यासाठी जंगलात लपवून ठेवलेली स्फोटकेही पोलिसांच्या हाती लागत आहे. त्यामुळे नागरिक दहशतमुक्त वातावरण काय असते याचा अनुभव घेत आहेत. (खाली वाचा)

गडचिरोली पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच समाजातील वंचित, गरजू आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. याच सामाजिक बांधिलकीतून दिवाळी सणाचे औचित्य साधून जिल्हाभरातील पोलीस स्टेशन, मदत केंद्रांसह गडचिरोलीतील नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत पोलीस अधीक्षक, एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली. (खाली वाचा)

यासोबतच गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट कृषी समृध्दी, तसेच सेवा मित्र मंडळ तथा आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांची दिवाळी आनंददायी व्हावी, या उद्देशाने अन्नधान्य व फराळ वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवून शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. (खाली वाचा)

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा यांनी पोलीस मदत केंद्र गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उप पोस्टे पेंढरी, तसेच अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे. यांनी उपपोस्टे जिमलगट्टा येथील नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील नागरिकांना मिठाई व फटाके वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. (खाली वाचा)

यासोबतच माओवादाच्या हिंसक विचारसरणीचा त्याग करून तसेच बंदुकीचा मार्ग सोडून शांततेचा आणि विकासाचा मार्ग स्वीकारणा­ऱ्या आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे, तसेच त्यांच्यामध्ये सुरक्षितता, विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण व्हावी यासाठी आत्मसमर्पित सदस्यांना मिठाई व फटाके वाटप करून पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिका­ऱ्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित सदस्यांसोबत फराळाचा आस्वाद घेण्यात आला. (खाली वाचा)

सदर उपक्रमाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी सांगितले की, “माओवादमुक्त गडचिरोलीच्या वाटचालीत केवळ सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थाच नव्हे, तर सामाजिक सलोखा, लोकसहभाग, विश्वास आणि विकास हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शांततामय, सुरक्षित व विकसित गडचिरोली घडविण्यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्याचा गडचिरोली पोलीस दलाचा संकल्प आहे.”