आरमोरी : क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन कासवी (टोली) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा आदिवासी गोंड समाज, कासवी (टोली) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन, माल्यार्पण तसेच ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाला आरमोरी क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आयोजक व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित आदिवासी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना कृष्णा गजबे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, सामाजिक एकता टिकवावी तसेच आपली संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला लढा आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला परिसरातील आदिवासी समाजबांधव, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































