गडचिरोली : जिल्ह्यातील घोट क्षेत्रांतर्गत मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाही टोला, पेटतळा आणि भाडभिडी या गावांतील शेकडो शेतकरी अनेक वर्षांपासून शेतीच्या कायदेशीर पट्ट्यांपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचे पट्टे मिळावेत, या मागणीसाठी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले.
यावेळी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांची व्यथा प्रशासनासमोर मांडण्यात आली. सदर गावांमधील शेतकरी सन 1958 पासून संबंधित जमिनीवर प्रत्यक्ष शेतीची वहिवाट करीत आहेत. त्यांच्या ताब्यात जुन्या अतिक्रमण पंजीसह जमिनीच्या वहिवाटीसंदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र, अद्याप भूमी अभिलेख विभागाकडे या शेतीशिवाराची अधिकृत नोंदणी झालेली नसून जमिनींचे गट क्रमांक अथवा सर्व्हे क्रमांकही निश्चित झालेले नाहीत. परिणामी, जमिनीचे कायदेशीर पट्टे आणि सातबारा उतारे उपलब्ध नसल्यामुळे हे शेतकरी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित राहत आहेत.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधत उपलब्ध कागदपत्रे व संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी, जमिनीची मोजणी आणि महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रकरणावर प्रशासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे मिळण्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, डॉ.प्रणय खुणे, भाजप नेत्या अनिता रॉय, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, उपाध्यक्ष किशोर कुंडू, पलास घरामी, माजी सरपंच रमेश लेकलवार, आनंदराव तुंकलवार, अंकित मोहुर्ले, रवींद्र गर्तुलवार, देविदास गर्तुलवार, बाबुराव बर्लावार, गिरीधर आलाम, योगेंद्र चौधरी, गजानन गर्तुलवार यांच्यासह इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
































