गडचिरोली : हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने जीवघेण्या अवस्थेत दाखल झालेल्या 30 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करून तिला जीवनदान दिले. गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा फुटल्यामुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे आणि रक्ताच्या कमतरतेमुळे संबंधित महिला गंभीर शॉकच्या अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती. अत्यंत गंभीर परिस्थितीत वैद्यकीय पथकाने वेळीच उपचार आणि तातडीची शस्त्रक्रिया केल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

सीमा रॉय असे या रुग्ण महिलेचे नाव आहे. तिला रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले तेव्हा तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच 5.8 ग्रॅम/डेसीलिटर इतके होते. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक जीवनरक्षक उपचार सुरू केले. त्यानंतर पुढील उपचार आणि प्रकृती स्थिर करण्यासाठी तिला अतिदक्षता विभागात (ICU) हलविण्यात आले.
सविस्तर वैद्यकीय तपासणीत गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा फुटल्याचे निदान झाले. ही अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणीची स्थिती असून, त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यानुसार रुग्णावर आपत्कालीन एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाचा रक्तदाब अत्यंत अस्थिर होता, तीव्र रक्ताक्षय होता. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नॉरअॅड्रेनालिन औषधाचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शस्त्रक्रिया आणि भूल व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक होते.
रुग्णाला शस्त्रक्रियागृहात हलवितानाच एकाच वेळी रक्त संक्रमण आणि आवश्यक जीवनरक्षक उपचार सुरू ठेवण्यात आले. शल्यचिकित्सकांच्या विशेष पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली, तर शस्त्रक्रियेदरम्यान भूल व्यवस्थापन आणि रक्तदाब व इतर महत्त्वाच्या शारीरिक कार्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रुग्णालयातील भूलतज्ज्ञांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली.
रुग्णाची शस्त्रक्रियेपूर्वीची स्थिती अत्यंत गंभीर असूनही संपूर्ण शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरीत्या पूर्ण झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुढील निरीक्षण, देखरेख आणि उपचारांसाठी पुन्हा अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तातडीने निदान, अचूक शस्त्रक्रिया व भूल व्यवस्थापन आणि विविध वैद्यकीय विभागांमधील समन्वयपूर्ण सहकार्यामुळे रुग्णाला वेळेत व योग्य उपचार मिळू शकले.
या जीवनरक्षक कामगिरीबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. डॉक्टरांसह उपचार प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे आणि कार्यतत्परतेचे त्यांनी कौतुक केले. लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमधील आधुनिक वैद्यकीय सुविधा दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः गंभीर आणि आपत्कालीन परिस्थितीत या सुविधा परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आरोग्य आधार ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
































