
गडचिरोली : वर्षानुवर्षे भौतिक सुविधांपासून दूर असलेल्या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागाला आता विकासाचा स्पर्श होऊ लागला आहे. अनेक अडचणींवर मात करत भामरागड तालुक्यातील मोरगेट्टा या गावात, तसंच एटापल्ली तालुक्यातील बोदली टोला या गावातील 16 कुटुंबांच्या घरात वीज पोहोचवण्यात महावितरणला यश आले. विशेष म्हणजे या कामात पोलीस दलाने पुढाकार घेत मोठी मदत केली. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा घेतलेल्या घरांसह तेथील रहिवाश्यांचे चेहरे प्रकाशाने आणि आनंदाने उजळून निघाली आहेत.
नेलगुंडा येथे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 30 जानेवारी 2025 रोजी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. तत्पूर्वी 3 वर्षांपुर्वी या भागातील मोरमेट्टा गावात विद्युत पुरवठा पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अवघड भूभाग व जंगल परिसरामुळे त्यावेळी हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नव्हता. दरम्यानच्या काळात विद्युत खांब पडल्यामुळे व तार जोडणी तुटल्यामुळे सदर पुरवठा सुरळीत करणे अधिक आव्हानाचे झाले होते. या अनुषंगाने गावातील नागरिकांना विद्युत पुरवठा मिळण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यानुसार महावितरणच्या मदतीने अखेर तार जोडणी पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात यश आले. या उपक्रमामूळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे.
अतिदुर्गम बोदली टोला गाव उजळले
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम बोदली टोला गावातील 16 कुटुंबांच्या घरात वीज पुरवठा झाला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावाच्या विद्युतीकरणाला गती मिळाली असून महावितरणच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
बोदली टोला गावाच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा आदिवासी विकास उपयोजना सन 2025-26 अंतर्गत 33 लाख 60 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून 2.50 किलोमीटर उच्चदाब वाहिनी, 1 किलोमीटर लघुदाब वाहिनी आणि 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले. महावितरणने 4 नोव्हेंबर 2026 रोजी विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले.
यापूर्वी विजेअभावी ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजात तसेच मुलांच्या शिक्षणात विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. आता घरगुती वीजपुरवठा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे सुलभ होणार असून शेतीशी संबंधित कामे आणि गावातील विकासात्मक उपक्रमांनाही चालना मिळण्याची आशा महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी व्यक्त केली.
सुविधांमुळे विकासाला मिळाली गती
दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. भामरागड उपविभागातील मोरमेट्टा येथे वीज पोहोचवण्यासाठी केलेला पाठपुरावा हा त्याचाच एक भाग आहे. नेलगुंडा पोलीस स्टेशनच्या स्थापनेमुळे दीर्घकाळापासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या नेलगुंडा हद्दीतील गावांत विकासाला आता चालना मिळाली आहे. पोलीस दलाच्या सहकार्यातून बोगामी नाल्यावर पूल बांधून देण्यात आल्यामुळे परिसरातील गावांची दळणवळण व संपर्क व्यवस्था अधिक सुलभ झाली आहे. तसेच पोलीस दलाच्या माध्यमातून नेलगुंडा गावामध्ये सोलर लॅम्प बसविण्यात आले आहेत. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य, महिला सक्षमीकरण व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने महिला मेळावा, आरोग्य मेळावा, कृषी मेळावा, आधार कार्ड शिबिर व जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात येऊन जवळपास 2,500 नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले आहेत. या विकासाला गतीमान करण्यासाठी दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्थेची कमतरता आणि सुरक्षा संदर्भातील अडचणी असूनही पोलीस दलाने संबंधित विभागांशी समन्वय साधून मोरमेट्टा गावामध्ये विद्युत पुरवठा सुरु केलेला आहे. यामुळे नागरिकांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होतील, अशी आशा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी व्यक्त केली आहे.
सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मुलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण 567 मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली आहे. एकूण 424.27 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे आणि 65 पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदर उपक्रम प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करणारे ठरत आहेत.
































