Home पब्लिक प्रॉब्लेम नगर पंचायतच्या अव्यवस्थेविरोधात कुरखेड्यात भिक मांगो आंदोलन

नगर पंचायतच्या अव्यवस्थेविरोधात कुरखेड्यात भिक मांगो आंदोलन

जमा रक्कम नगर पंचायतला देणार

कुरखेडा : येथील नगर पंचायत प्रशासनाच्या कथित अव्यवस्था, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ कुरखेडा कृती समितीच्या वतीने शनिवारी “भीक मांगो आंदोलन” करण्यात आले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने हे आंदोलन पार पडले.

या आंदोलनाची सुरुवात शहरातील फवारा चौक येथून झाली. एकत्र आलेल्या आंदोलनकर्त्यांनी कुरखेडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुख्य बाजारपेठेत पदयात्रा काढत व्यापारी, नागरिक व विविध प्रतिष्ठानांना भेटी दिल्या. नगर पंचायत प्रशासनाकडून वारंवार “निधी उपलब्ध नाही” हे कारण देऊन मूलभूत नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात भीक मागून जनजागृती केली.

आंदोलनादरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या माध्यमातून जमा झालेली रक्कम सोमवारी कुरखेडा नगर पंचायत कार्यालयात अधिकृतपणे जमा करण्यात येणार आहे. शहरातील प्रलंबित व रखडलेल्या नागरी सुविधा तातडीने पूर्ण करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे कृती समितीने सांगितले.

या आंदोलनात कुरखेडा कृती समिती अध्यक्ष दीपक धारगाये, कुंवर लोकेंद्र शहा सय्याम, सचिव ईश्वर ठाकूर, सहजाद हाशमी, नसिर हाशमी, हिरा चौधरी, गणेश चौधरी, हिरा वालदे, रविंद्र साखरे, ताहीर शेख, साहिल सहारे, आसिफ (टोनू) शेख, आकाश उईके, राहुल कोवे यांच्यासह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कुरखेडा शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही कुरखेडा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

या समस्यांकडे वेधले लक्ष

आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेचा अवमान करणे नसून, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. रुग्णवाहिका दुरुस्ती, शीतपेटी उपलब्ध करणे, अपूर्ण समाजभवन पूर्ण करणे, हनुमान मंदिर परिसरातील वॉटर एटीएम सुरू करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करणे, स्वच्छ पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृह, नाला बांधकाम, सार्वजनिक मूत्रालयाची दुरुस्ती, वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणे, आठवडी बाजारातील सुविधांमध्ये सुधारणा, तसेच इतर प्रलंबित नागरी कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.