
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गडचिरोली आगार व विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, प्रवासी सेवेतील अडचणी, बसेसची सुरक्षितता, तसेच दुर्गम भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एसटीच्या गडचिरोली विभागीय कार्यालयात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.
माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि सेवा शक्ती संघर्ष युनियनचे गडचिरोली मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भाजपचे जिल्हा महामंत्री तथा विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश गेडाम, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन कोडवते, भाजप महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या डॉ.चंदा कोडवते, विभाग नियंत्रक (DC) वडस्कर, आगार व्यवस्थापक (DM) सचिन नेवारे, सुरक्षा अधिकारी लोखंडे, विभागीय सचिव नवनाथ घायाळ, उपाध्यक्ष बंडुजी पत्तीवार, तसेच संघटनेचे पदाधिकारी, चालक-वाहक, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान संघटनेच्या वतीने प्रशासनाला विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये चालक-वाहकांच्या रजा कोट्याचा प्रश्न, वैद्यकीय रजा मंजुरी, ई-तिकीट (ETIM) मशीनमधील सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी, चालकांवर लादण्यात येणारे अन्यायकारक दंड, कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत सुविधा तसेच प्रवासी सेवेतील त्रुटी यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
चालक-वाहकांच्या प्रमुख मागण्या
चालक व वाहकांची संख्या उपलब्ध असतानाही रजा कोटा 20 वरून 10 करण्यात आला असून तो पूर्ववत वाढविण्यात यावा, जून महिन्यातील प्रलंबित वैद्यकीय रजा तात्काळ मंजूर करण्यात याव्यात, ETIM मशीनमध्ये प्रिंट निघत नसणे, बॅटरी अचानक बंद पडणे, चार्जिंगची समस्या यावर EBIX कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत तातडीने उपाययोजना करून दोषपूर्ण बॅटऱ्या बदलाव्यात, बसेसच्या झिजलेल्या टायरांमुळे होणाऱ्या तांत्रिक त्रुटींसाठी चालकांना जबाबदार धरून त्यांच्या वेतनातून करण्यात येणारी 10 टक्के दंड कपात तात्काळ थांबवावी, गडचिरोली व अहेरी आगारात कर्मचाऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अहेरी आगारातील नक्षलपीडित कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, आलापल्ली बसस्थानक परिसरातील अवैध पार्किंग हटवून वाहतूक कोंडी दूर करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेवर चर्चा
यासोबतच डॉ.अशोक नेते यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न अत्यंत ठामपणे उपस्थित केले. काही महिन्यांपूर्वी गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) येथे उमरखेड बसला झालेल्या भीषण अपघातात तीन निष्पाप जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आठवण करून देत त्यांनी त्या घटनेतील मदतकार्य, जखमींना देण्यात आलेली सहाय्यता राशी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती प्रशासनाकडे मागितली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये. प्रत्येक बसची नियमित फिटनेस तपासणी करून ब्रेक, टायर, स्टेअरिंग, इंजिन व इतर यांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी करण्यात यावी. नादुरुस्त व अतिजुन्या बसेस टप्प्याटप्प्याने बदलून नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दुर्गम व आदिवासी भागातील बंद पडलेल्या बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, नवीन बससेवा उपलब्ध करून विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित व वेळेवर सेवा मिळेल यासाठी नियोजन करण्यात यावे, अशीही सूचना त्यांनी केली. शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी व सुटल्यानंतर वेळेवर बस उपलब्ध व्हावी, यावर विशेष भर देण्यात आला.
बसस्थानकांवर स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रवासी निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम कराव्यात. तसेच जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या बससेवा सुरू करून मार्कंडा देव, मुतनूर आदी महत्त्वाच्या ठिकाणी नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणीही डॉ.नेते यांनी केली.
या बैठकीत विभाग नियंत्रक वडस्कर आणि आगार व्यवस्थापक सचिन नेवारे यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. नियमानुसार व तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या सर्व प्रश्नांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना व प्रवाशांना दिलासा देण्याचे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले.































