
गडचिरोली : प्रस्तावित विमानतळाच्या जागेची चाचपणी करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यास आलेल्या विमान प्राधिकरणच्या पथकाला गुरूवारी हिरापूरच्या गावकऱ्यांनी रोखल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरत असंतोष व्यक्त केला. एवढेच नाही तर सर्व्हेक्षण करणाऱ्यांना गाठून त्यांच्याकडील साहित्य जप्त करून ग्रामपंचायतमध्ये आणून ठेवले. पण पोलिसांनी सर्व्हेक्षण करणार नाही, असे सांगत साहित्य परत मागवून पुन्हा सर्व्हेक्षणाचा प्रयत्न केल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीही करणार नाही, अशी भूमिका आधी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलीस संरक्षणात ड्रोनच्या माध्यमातून आणि इतर उपकरणांच्या मदतीने शेताच्या बोडीजवळ सकाळपासून सर्व्हेक्षण सुरू केले. यावेळी 300 वर पोलिसांचा बंदोबस्त लावलेला होता. पण सर्व्हेक्षण सुरू झाल्याचे समजल्यानंतर हिरापूरच्या गावकऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व महिला-पुरूष आणि मुलेही भर उन्हात एकत्र जमली.
विमानतळ न करण्याची हमी देणार का?
दरम्यान सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण एम., उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांनी गावात येऊन जमलेल्या नागरिकांना समजावत हे फक्त प्राथमिक सर्व्हेक्षण आहे, अजून जागा निश्चित नाही असे सांगितले. पण गावकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सर्व्हेक्षणाअंती हीच जागा निश्चित झाली तरीही येथे विमानतळ होणार नाही, असे हमीपत्र देता का, अशी विचारणा गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. मात्र आम्हाला तसा अधिकार नसल्याचे सांगत उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला.
पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढविणार?
शुक्रवारी भर उन्हात गावातील नागरिक सर्व्हेक्षण करणाऱ्यांचा माग घेत होते. तणावसदृश परिस्थिती पाहता तहसीलदार सागर कांबळे, गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हेसुद्धा गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. हिरापूरप्रमाणेच गुरवळा आणि त्या भागातील इतर गावकऱ्यांनीही आपल्या जमिनी विमानतळासाठी देण्यास विरोध दर्शवल्याने प्रशासनाला आता इतर पर्यायांकडे वळावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आज शनिवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढवून सर्व्हेक्षण केले जाण्याची शक्यता आहे. मात्र आमच्यावर कितीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी व्यक्त केली.






























