Home दैनंदिन बातम्या आष्टीत शेतकऱ्यांच्या चक्काजामची फलश्रृती, दाखल गुन्हे मागे घेणार

आष्टीत शेतकऱ्यांच्या चक्काजामची फलश्रृती, दाखल गुन्हे मागे घेणार

हजारावर शेतकऱ्यांचा 8 तास ठिय्या

आंदोलनादरम्यान रात्री अशा रस्त्यावरच पंगती उठल्या

आष्टी : प्रकल्पांसाठी शेतजमिनींचे सर्व्हेक्षण करण्यास विरोध केला म्हणून गुन्हा दाखल केलेल्या शेतकऱ्यांना गुन्हेमुक्त करण्याच्या मागणीसाठी हजारावर शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी आष्टीतील मुख्य चौकात ठाण मांडून चक्काजाम केला होता. त्यामुळे 8 तासांपेक्षा जास्त वेळपर्यंत सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी पुराव्याअभावी गुन्हे मागे घेत असल्याचे समजपत्र दिल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन थांबवण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

गडचिरोली जिल्ह्यातील लोहखनिजावर आधारित उद्योगांसाठी सुरू असलेल्या शेतजमीनींच्या अधिग्रहणाला आष्टी परिसरातील 13 ते 14 गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यात जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवल्याप्रकरणी 7 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी 7 ऑगस्ट रोजी आष्टी पोलीस ठाण्यावर धडक दिली.

गुन्हे मागे घ्या आणि जमीन अधिग्रहण थांबवा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आष्टीच्या मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करून सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प केली. महिला-पुरूषांसह मुलेही यात सहभागी होते. संध्याकाळ झाली तरीही यावर तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तिथेच ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिथेच स्वयंपाक करून आंदोलकांनी जेवणेही उरकली. त्यानंतर आराम सुरू असताना रात्री उशिरा आष्टी पोलिसांनी त्या 7 शेतकऱ्यांवरील गुन्हा पुराव्याअभावी मागे घेत असल्याचे समजपत्र दिले. कायद्यानुसार क्लोजर रिपोर्ट न्यायालयात लवकर सादर करून गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येईल, असे त्यात नमूद केले होते. या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.