Home पब्लिक प्रॉब्लेम अभियंता साखरवाडेंचे प्रकरण पोहोचले सहपालकमंत्र्यांकडे

अभियंता साखरवाडेंचे प्रकरण पोहोचले सहपालकमंत्र्यांकडे

नेत्यांनी वाचला कारनाम्यांचा पाढा

गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कार्यकाळातील अनेक कामांबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांना गडचिरोली जिल्ह्यातून बाहेर करण्याची मागणी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे करण्यात आली. आ.डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी कात्रटवार यांनी ना.जयस्वाल यांच्यासमोर अभियंता साखरवाडे यांच्या कारनाम्यांचा पाढा वाचला. एक अधिकारी तब्बल 8 वर्षापासून एकाच जिल्ह्यात, एकाच विभागात ठाण मांडून कसा का बसू शकतो ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोरची तालुक्यातील नाडेकल-बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारीसाठी सुरू होण्यापुर्वीच कोसळला. 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात अर्धवट कामांची बिले काढण्यात आली, तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या ऑफलाईन निविदा नियबाहयरित्या काढण्यात आल्याचा आरोप कात्रटवार यांनी केला आहे. सदर कामे कार्यकारी अभियंत्याने केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला. ते शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देत असल्याचाही कात्रटवार यांचा आरोप आहे.

जनतेचा शासन व प्रशासनाप्रती असलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कायदेशिर कारवाई करून त्यांची गडचिरोली जिल्हयातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी अरविंद कात्रटवार यांनी सहपालकमंत्री जयस्वाल यांच्याकडे केली.