गडचिरोली : खरीप हंगामाचे वेध लागताच जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्र असलेल्या भागात प्रतिबंधित बीटी कापूस बियाणे विक्रीचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे अशाच पद्धतीने छुप्या मार्गाने अनधिकृत कापूस बियाणे विक्रीचा प्रयत्न जिल्हास्तरीय भरारी पथक आणि आष्टी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हाणून पाडण्यात आला. यात एका कारसह 60 किलो बियाणे, असा मिळून एकूण 7 लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
एका कारमधून अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा भरारी पथक आणि पोलीस स्टेशन आष्टी यांनी संयुक्तपणे सापळा रचून ही कारवाई केली. यात गौरव बिटपल्लीवार रा.मार्कंडा, ता.चामोर्शी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाई करणाऱ्यांमध्ये कृषी विभागाच्या वतीने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, चामोर्शीचे कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) चेतन चलकलवार, धानोराचे कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) पवन मडावी, तसेच आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता. ही कारवाई कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
































