‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे गडचिरोली-चामोर्शीत मदत कार्यालय

महिलांनो लाभ घ्या, अशोक नेते यांचे आवाहन

गडचिरोली : राज्य सरकारने महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरून देण्यासाठी आणि कागदपत्रे जुळवण्यासाठी गडचिरोली आणि चामोर्शी येथे मदत कार्यालय सुरू करण्यात आले. शुक्रवार, दि.5 रोजी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, माजी खा.अशोक नेते यांच्या हस्ते या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींची धावपळ आणि त्रास होऊ नये याकरिता अशोक नेते यांच्या पुढाकाराने त्यांच्या गडचिरोलीतील चामोर्शी रोडवरच्या जनसंपर्क कार्यालयात मदत कार्यालय सुरू करण्यात आले. तसेच चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयातही मदत कार्यालय सुरू करण्यात आले.

या योजनेत 21 ते 65 वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी शासन दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरावे. फॅार्म भरताना महिलांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. राज्य सरकारच्या माध्यमातून युवा, शेतकरी, दुर्बल-महिला अशा विविध घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचा प्रचार व प्रसार वेगाने करण्याच्या सूचनाही यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी केल्या.

याप्रसंगी मा.खा.अशोक नेते यांनी योजनेच्या काही लाभार्थी महिलांना स्वतः फॅार्म भरून देऊन या कामाचा शुभारंभ केला. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन नेते यांनी महिलांना केले.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा सचिव वर्षा सेडमाके, जिल्हा सचिव रंजीता कोडाप, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुघाडकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख वर्षा मोरे, शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे, अविनाश विश्रोजवार, श्याम वाढई, श्रीकांत पतरंगे, देविदास नागरे, अरुण नैताम, तसेच मोठ्या संख्येने फॅार्म भरण्यासाठी आलेल्या लाभार्थी महिला, भगिनी उपस्थित होत्या.