देसाईगंज : मुंबई येथे सुरू असलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी चर्चेत सहभागी होऊन आरमोरी मतदार संघातील विविध समस्या मांडून त्या समस्या दूर करण्यासाठी लक्ष द्यावे, असे साकडे घातले.
त्यात प्रामुख्याने वृद्ध कलावंतांचे मंजूर झालेले मानधन जमा करणे, मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्याचे अनुदान द्यावे, जून 2023 मध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील नदीकाठावरील वाहून गेलेली शेती व पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, मतदार संघातील मोहरा प्रजातीच्या धान पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नापिकीची नुकसानभरपाई देण्यात यावी, मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेली रस्ते व पुलाची कामे अपुऱ्या निधीमुळे बंद पडलेली असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकरिता विभागाने मागणी केल्याप्रमाणे आवश्यक निधी उपलब्ध करण्यात यावा आदी मागण्या त्यांनी केल्या.
महायुती शासनाने शेतकरी, महिला, युवक व गरीबांसाठी कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.