धान खरेदीसाठी दक्षिण गडचिरोलीत ३९ केंद्र सज्ज, नोंदणीच्या कामाला वेग

कुठे-कुठे आहेत हे केंद्र, वाचा सविस्तर

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाने यावर्षी धान खरेदीसाठी पुढाकार घेत तब्बल ३९ खरेदी केंद्र सज्ज केले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी शेतकऱ्यांची नोंदणीही जोमाने सुरू आहे. ही नोंदणी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी) व्ही.एस.बरकमकर यांनी केले आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय अहेरी मार्फत मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या ५ तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यात अहेरी, बोरी, कमलापुर, बेलगूर, इंदाराम, उमानूर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, देचलीपेठा, मुलचेरा, सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, पेटीपाका, जाफ्राबाद, रोमपल्ली, बामणी, विठ्ठलरावपेठा, भामरागड, लाहेरी, ताडगांव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर, जारावंडी, गर्देवाडा या केंद्रांसह कसनसुर, एटापल्ली असे महामंडळाचे दोन केंद्र राहणार आहेत. एकूण केंद्रांपैकी आ.वि.का.सहकारी संस्थांचे ३३, उपकेंद्र ३, महामंडळाचे २ केंद्र व १ उपकेंद्र असे एकुण ३९ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

कोटमी/हालेवारा परिसरातील शेतकऱ्यांनी महामंडळाचे खरेदी केंद्र कसनसूर येथे आणि गेंदा परीसरातील शेतकऱ्यांनी महामंडळाचे खरेदी केंद्र एटापल्ली येथे, तसेच गट्टा येथील शेतकन्यांनी आ.वि.का.सह.संस्था गदेवाडा येथे व उडेरा येथील शेतकऱ्यांनी आ.वि.का.सह.संस्था हेडरी येथे जाऊन खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी केले.

तसेच खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच्या आ.वि.का.सह. संस्थेच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधुन दि.३० पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सातबारा, आधार कार्ड, नमुना ८ अ, चालू बँक पासबुक व इतर आवश्यक दस्तावेज घेऊन स्वत: हजर राहुन ऑनलाईन नोंदणी करावी आणि शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.एस.बरकमकर यांनी कळविले.