‘प्रोजेक्ट शक्ती’अंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीर

आत्मसमर्पित नक्षलपुत्रीला कृत्रिम पाय

गडचिरोली : दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगता यावे, त्यांचे जीवन सुलभ व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट शक्ती’अंतर्गत दिव्यांग नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दल, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3030, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ, महावीर सेवा सदन व इंडिया ह्रुमॅनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये या शिबिराला सुरूवात करण्यात आली. यासाठी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील 250 नागरिकांनी कृत्रिम अवयव मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे त्यातील लाभार्थ्यांमध्ये 2015 मध्ये गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण करणाऱ्या विनू पोदाळी या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची मुलगी सपना हिचासुद्धा समावेश आहे. सपना जन्मापासून डाव्या पायाने दिव्यांग असल्याने तिला नवीन कृत्रिम पाय तयार करुन देण्यात आला आहे.

11 मार्च 2025 रोजी पर्यंत चालणा­ऱ्या या शिबिरात दिव्यांग नागरिकांना कृत्रिम हात व कृत्रिम पाय अशी उपकरणे मोफत लावून दिली जाणार आहे. उद्घाटन समारंभास गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील 40 दिव्यांग नागरीक उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र व आवश्यक असलेले विविध साहित्य वाटप केल्याने त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सदर उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.सुनील मडावी, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजिंदर सिंग खुराना, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी विरेंद्र पात्रीकर, ट्रायबल वेलफेअर कमिटी इंटरनॅशनल नागपूरचे डिस्ट्रीक्ट चेअरमन राजीव वरभे, जयपूर फुट कमिटी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 च्या डिस्ट्रीक्ट चेअरमन ज्योतीका कपूर, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थच्या अध्यक्षा मनिषा मंघानी व रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीचे अध्यक्ष सुनिल बट्टुवार हे उपस्थित होते.

आतापर्यंत 3 दिव्यांग मेळावे

आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलाकडून 3 दिव्यांग मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 1630 दिव्यांग नागरिकांना दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, 990 दिव्यांगांना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, 1647 दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, 881 नागरिकांना कृत्रिम अवयव साहित्य (हात-पाय) व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.