गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील एका जि.प.शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिकेचे प्रेमचाळे चर्चेत आले असताना भामरागड तालुक्यातील एका जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशालाच काळीमा फासली आहे. चक्क छोट्या शाळकरी मुलींसोबत लैंगिक चाळे करण्याचा अश्लाघ्य प्रकार मुख्याध्यापकाने केला आहे. त्या मुख्याध्यापकाला भामरागड पोलिसांनी लगेच अटक केली आहे. रविंद्र गव्हारे असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा आणि आपल्या पँटची चेन उघडून मुलींशी चाळे करायचा. याबाबत कोणाला काही सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी द्यायचा. यामुळे घाबरलेल्या मुलींनी आधी पालकांनाही याबाबत सांगितले नाही. पण काही मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारले. त्यानंतर मुलींनी रडत या किळसवाण्या प्रकाराची वाच्यता केली. जागरूक पालकांनी इतर मुलींकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याशीही असा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
पती-पत्नीने मागितली माफी
भामरागडचा रहिवासी असलेल्या मुख्याध्यापकाचे हे चाळे उघडकीस आल्यानंतर त्याला गावातील गोटुलमध्ये पाचारण करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यासह त्याच्या पत्नीने विद्यार्थिनींच्या पालकांची माफी मागितली. पण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी या गंभीर प्रकाराला माफ करणे शक्य नसल्याचे सांगत लाहेरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल करून केली अटक
मुख्याध्यापक गव्हारे याच्या लैंगिक छळाला बळी पडलेल्यांमध्ये आदिवासी मुली होत्या. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी या प्रकरणाची सुत्रे हाती घेतली आणि मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याच्याविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॅासिटीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.